ठाणे | प्रतिनिधी
ठाणे शहराच्या सौंदर्यात व पर्यटन क्षमतेत लक्षणीय भर घालण्यासाठी ठाणे खाडीकिनारी उभारण्यात येणाऱ्या २६० मीटर उंच व्हिविंग टॉवरसह विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे सादरीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांनी आज केले. या प्रकल्पांमुळे ठाणे शहर आधुनिक पायाभूत सुविधा, पर्यटन आणि विरंगुळ्याच्या दृष्टीने नवे केंद्र ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
ठाणे खाडीकिनारी सुमारे ५० एकर जागेत भारतातील सर्वांत उंच असा २६० मीटर उंचीचा व्हिविंग टॉवर उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प ठाण्याच्या पर्यटन नकाशावर मैलाचा दगड ठरणार आहे. यासोबतच कासारवडवली येथे भव्य कन्व्हेन्शन सेंटर तसेच कोलशेत येथे २५ एकर जागेत अत्याधुनिक टाऊन पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे.
याशिवाय आगरी-कोळी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आगरी कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र उभारण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क, ॲम्युझमेंट पार्क व ॲडव्हेंचर पार्कही विकसित करण्यात येणार आहेत. ठाण्यात १२.५ एकर क्षेत्रात पक्षी संग्रहालय, २५ एकरमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर तसेच ५० एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचे नियोजन आहे.
हरित विकासाला चालना देण्यासाठी ठाणे महापालिकेमार्फत मीरा-भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास जोडणारा १८.४ किलोमीटर लांबीचा ‘आनंदवन’ हरित पट्टा विकसित केला जाणार आहे. या हरित पट्ट्यामुळे पर्यावरण संवर्धनासह नागरिकांना विरंगुळ्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
या सर्व प्रकल्पांमुळे ठाणे शहराच्या सौंदर्यात, पायाभूत सुविधांमध्ये तसेच नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.






