सावंतवाडी मतदारसंघातील मंदिरांना भेट; कोकणवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना
वेंगुर्ला | प्रतिनिधी :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भारतीय जनता पक्षाचे राज्य युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी सावंतवाडी मतदारसंघातील विविध विठ्ठल मंदिरांना भेट देत विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कोकणवासीयांच्या सुख, शांती, समृद्धी आणि निरामय जीवनासाठी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यात आयोजित धार्मिक कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली. वारकरी संप्रदायातील भाविकांसमवेत विठ्ठल नामाचा गजर करत पूजा-अर्चा आणि धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.
वेंगुर्ला येथील कार्यक्रमात विठ्ठल नामस्मरण आणि भजनाच्या वातावरणात विशाल परब यांनी वारकऱ्यांसोबत भक्तिभावाने सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे धार्मिक सोहळ्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे उपस्थित भाविकांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवडळकर, नगरसेवक सचिन शेट्ये व रवी शिरसाट, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष साईप्रसाद नाईक, मच्छीमार नेते दादा केळुसकर, किरण कुबल, विजय रेडकर, विजय बागकर, सुनील मठकर, राजू गिरप, रसिका मठकर, किशोर रेवणकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत वारकरी परंपरेप्रती आदर व्यक्त केल्याबद्दल भाविकांनी विशाल परब यांचे स्वागत केले.







