Malvan recorded 58.90% voter turnout in Sindhudurg district elections. Shiv Sena district chief Datta Samant expressed strong confidence in Mahayuti’s historic victory after casting his vote.
मालवण (प्रतिनिधी):
मालवण तालुक्यात सरासरी ५८.९० टक्के मतदान झाले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या बाजूने अत्यंत पोषक व उत्साही वातावरण आहे. या निवडणुकीत महायुती ऐतिहासिक विजय नोंदवेल आणि जिल्ह्यात नवा विक्रम प्रस्थापित होईल, असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मतदानानंतर व्यक्त केला.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाऊ सामंत तसेच महायुतीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सामंत म्हणाले की, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली जिल्ह्यात महायुतीची वज्रमूठ अधिक मजबूत झाली आहे. जिल्हा परिषदांच्या ५० जागा आणि पंचायत समितीच्या १०० जागांवर महायुती १०० टक्के यश मिळवेल, असे चित्र सध्या दिसत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांचा प्रभाव मतदारांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम केले असून विरोधकांचे अस्तित्व जिल्ह्यात नगण्य राहिले आहे, असा दावा त्यांनी केला. जनता केवळ विकासाच्या बाजूनेच मतदान करत असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
महायुतीने केलेल्या कामगिरीमुळे या निवडणुकीचा निकाल महाराष्ट्रात एक वेगळा विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि नेत्यांच्या नियोजनामुळे महायुती जिल्ह्यात ‘नंबर वन’ ठरेल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.







