मालवण | प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. ममता मोहन वराडकर यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे नियुक्तीपत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी प्रदान केले आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री नितेश राणे कार्यरत आहेत. जिल्ह्यातील विविध भागांतील आरोग्यविषयक समस्या, आरोग्य सुविधांतील अडचणी तसेच उपाययोजनांबाबत समितीच्या माध्यमातून चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जातात.
मालवण शहरातील आरोग्यविषयक प्रश्न प्रभावीपणे समितीसमोर मांडता यावेत तसेच शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा करता यावा, या उद्देशाने नगराध्यक्षा ममता वराडकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नगराध्यक्षा वराडकर यांच्या या निवडीमुळे मालवण शहराच्या आरोग्यविषयक प्रश्नांना जिल्हास्तरावर अधिक प्रभावीपणे वाचा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.







