मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकर नागरिकांना मोठी विकासात्मक भेट देत महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेचा समावेश असलेल्या एकूण २९५ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या ‘सेंट्रल पार्क’ प्रकल्पाचा विकास आराखडा आज सादर केला. हा प्रकल्प मुंबईकरांसाठी आतापर्यंतचे सर्वांत मोठे सार्वजनिक उद्यान ठरणार आहे.
या सेंट्रल पार्कला भूमिगत मार्गांद्वारे थेट कोस्टल रोड तसेच मेट्रो मार्गांशी जोडण्यात येणार असून रेसकोर्सच्या ऐतिहासिक वारशाला कुठलाही धक्का न लागता विकास साधला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आधुनिक सुविधा आणि वारसा जतन यांचा समतोल राखण्यात येणार आहे.
२९५ एकर जमिनीवर विकसित होणाऱ्या या भव्य सेंट्रल पार्कच्या खाली सुमारे १० लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे अत्याधुनिक, जागतिक दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. या कॉम्प्लेक्समध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडासुविधांसह पारंपरिक मराठमोळ्या खेळांकरिता — खो-खो, कबड्डी यांसारख्या खेळांसाठीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या प्रकल्पामुळे सुमारे ३०० एकरचे ऑक्सिजन पार्क निर्माण होणार असून, त्यामुळे मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने सेंट्रल पार्क १,२०० मीटर लांबीच्या भूमिगत मार्गाने कोस्टल रोडशी जोडण्यात येणार असून, यासाठी ५५० कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांचे डिझाइन प्रसिद्ध आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रसंगी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी तसेच आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.






