मालवण, प्रतिनिधी :
“शाश्वत मूल्ये आणि रोजगाराभिमुख शिक्षण ही आजच्या विद्यार्थ्यांची खरी शक्तिस्थळे आहेत. बहुविध कौशल्याधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी विकासाची नवी दारे खुली होत असून, ग्रामीण भागही समृद्ध करण्याची क्षमता या शिक्षण पद्धतीत आहे,” असे प्रतिपादन कट्टा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी केले.
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त) येथे आयोजित बहुविध कौशल्य (मल्टी स्किल) प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव सुनील नाईक, स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर, खजिनदार श्याम पावसकर, संचालक महेश वाईरकर, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचे समन्वयक भूषण गावडे, पर्यवेक्षक महेश भाट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मनोगतात अजयराज वराडकर यांनी बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयोग राबविण्यात आला असून, त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागल्याचे सांगितले. शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्ये आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मल्टी स्किलच्या निदेशक कु. योगिता सोहनी यांनी बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती देत, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून मिळणाऱ्या कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात कु. गौरांग वाईरकर, कु. कृतिका लोहार, कु. सोहम गुरव आणि कु. ओंकार रोहीलकर या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील अनुभव आणि त्यातून झालेला व्यक्तिमत्त्व विकास याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षांत विविध विभागांत आत्मसात केलेल्या कौशल्यांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे आकर्षक प्रदर्शनही भरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन हडलगेकर यांनी केले.







