मालवण, प्रतिनिधी :
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी दिंडी काढत विठ्ठलभक्तीचा अनोखा संदेश दिला. “जय जय विठ्ठल… जय हरी विठ्ठल…” या अखंड नामघोषाने परिसर भक्तिमय झाला असून, चिमुकल्यांच्या वारकरी वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकरी यांच्या पारंपरिक वेशभूषा साकारल्या होत्या. कपाळावर टिळा, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगव्या पताका, तर टाळ-चिपळ्यांच्या साथीने विठ्ठलनामाचा गजर करत चिमुकल्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक वेशभूषा आणि वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविणाऱ्या या दिंडीने उपस्थितांची मने जिंकली.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, आषाढी एकादशीचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील भक्तीचा वारसा यांची ओळख करून देण्यात आली.
यावेळी भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, शिक्षिका राधा दिघे, स्वाती दळवी, मानसी परुळेकर, तृप्ती वालावलकर, योगिता तारी यांच्यासह हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







