आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वडाळा येथील ‘प्रतिपंढरपूर’ विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते महापूजा आणि महाअभिषेक उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
महापौर रितू तावडे यांनी भगवान विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा करून मुंबईकरांच्या सुख-समृद्धी, आरोग्य, शांतता आणि मुंबई महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले. तसेच शहरावर कोणतेही संकट येऊ नये, सर्व नागरिकांना सुरक्षित, समृद्ध आणि आनंदी जीवन लाभावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.
या महापूजा व महाअभिषेक सोहळ्यास मंदिराचे विश्वस्त, भाविक, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसाने दुमदुमून गेला.
यावेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेत मुंबईच्या प्रगतीसह राज्याच्या आणि देशाच्या कल्याणासाठीही प्रार्थना केली.







