मालवण, प्रतिनिधी :
आजच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांचे विचार, संस्कार आणि गुण आत्मसात करावेत. हे गुण केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी उपयोगात आणावेत, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक तथा भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष रविराज पराडकर यांनी केले.
वायरी-भूतनाथ येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात आयोजित “शिवाजी महाराजांची जडणघडण” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भारतीय इतिहास संकलन समिती, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सचिव डॉ. कमलेश चव्हाण, कोकण प्रांताचे माध्यम प्रचार विभाग प्रमुख तुणीर कांबळी, शिवप्रेमी संघटना कुडाळचे विवेक पंडित, शिवम महाडेश्वर, जय डोंगरे, रेकोबा हायस्कूलचे शिक्षक श्रीनाथ फणसेकर, विक्रांत सौरभ, संभाजी कोरे, भूषण साटम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नंदकुमार डगरे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
व्याख्यानात रविराज पराडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतील अनेक महत्त्वपूर्ण पैलू विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले. शहाजीराजे भोसले यांचे दूरदृष्टीचे नियोजन, राजमाता जिजाऊंचे संस्कार, धैर्य, आत्मविश्वास आणि स्वराज्य स्थापनेचे स्वप्न यामुळे शिवाजी महाराज घडले, असे त्यांनी नमूद केले.
बालवयातच शिवाजी महाराजांनी विविध विषयांचा सखोल अभ्यास करून न्यायनिवाड्याची क्षमता, संघटन कौशल्य, माणसे जोडण्याची कला आणि स्वराज्य स्थापनेचा दृढ संकल्प कसा जोपासला, तसेच प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य कसे दिले, याची उदाहरणांसह माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. शिवचरित्रातून प्रेरणा घेत आदर्श नागरिक बनण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला प्रवीण कुबल, रामचंद्र गोसावी, रोहिणी दिघे, मिताली मोंडकर, शेर्लेकर, टेंबुलकर यांच्यासह शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संभाजी कोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.







