मालवण : प्रतिनिधी
मसुरे–मर्डे पंचायत समिती मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार संजय ठाकूर यांनी विजय संपादन केला. ठाकरे शिवसेनेचे उमेदवार वैभव चव्हाण यांचा त्यांनी ३२३ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात झालेली लढत अटीतटीची ठरली.
निवडणूक निकालानुसार संजय ठाकूर यांना १,८३४ मते मिळाली, तर वैभव चव्हाण यांना १,५११ मते प्राप्त झाली. या निवडणुकीत ‘नोटा’ला ९७ मते पडली. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत चुरस पाहायला मिळाल्याने निकालाबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
निकाल जाहीर होताच शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाके फोडून व जल्लोष करत कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले. या विजयामुळे मसुरे–मर्डे मतदारसंघात शिंदे शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.
या निकालामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.







