मेघल डिसोजा आणि राहुल जाधव यांचा सत्कार; विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी
मालवण | प्रतिनिधी :
दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या मालवणच्या मेघल डिसोजा आणि राहुल जाधव या युवकांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी संविधानाला न्याय मिळाल्याच्या भावनेतून मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी युवकांच्या सहभागाचे कौतुक करत, युवा शक्तीच्या एकजुटीमुळे आंदोलनाला यश मिळाल्याचे मत व्यक्त केले. तसेच, संबंधित प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
कार्यक्रमाला राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस देवानंद लुडबे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बाळू अंधारी, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, ओबीसी तालुकाध्यक्ष प्रवीण आचरेकर, आप्पा चव्हाण, चंदन पांगे, महिला तालुकाध्यक्ष प्राची माणगावकर, शहराध्यक्ष रुपाली फर्नांडिस, स्नेहल मेथर, अमृता मोंडकर, सारा फर्नांडिस, पराग माणगावकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.







