मालवण | प्रतिनिधी
“विद्या आणि ज्ञान हे विनम्र व्यक्तीलाच शोभून दिसते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) झपाट्याने विकसित होत असताना विद्यार्थ्यांनी भविष्यातील संधी लक्षात घेऊन करिअरची दिशा विचारपूर्वक निवडावी. तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था, शिक्षक आणि पालक कायम तुमच्या पाठीशी आहेत. भविष्यात यशस्वी झाल्यावर आपल्या शाळेकडे मागे वळून पाहा आणि तिचे ऋण फेडा,” असे प्रतिपादन काळसे-धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष, मुंबईचे माजी महापौर तथा शिवसेना आमदार आणि मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी केले.
काळसे-धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी विद्यामंदिर, काळसे आणि स्व. सौ. जयश्री वामन प्रभू कला व वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय, काळसे यांच्या वतीने आयोजित दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यासह अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुनिल प्रभू यांच्या हस्ते झाले. यावेळी बॅ. नाथ पै कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय, कुडाळचे प्रभारी प्राचार्य प्रा. अरुण मर्गज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष योगेश राऊळ, सचिव अनंत परब, सहसचिव शरद गोसावी, संचालक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपाध्यक्ष राजन प्रभू, संचालक सिताराम परब, डॉ. शरदचंद्र काळसेकर, उमेश प्रभू, शिवनंदन प्रभू, कमलेश गोसावी, सल्लागार केशव सावंत, विद्यार्थी सेवा संस्थेचे सहसचिव पंढरीनाथ प्रभू, मुख्याध्यापक अविनाश परब, सातेरी विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन परशुराम गुराम, श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार समितीचे सहसचिव संदीप माडये, संस्थेच्या माजी संचालक सुवर्णा काळसेकर, सुधीर प्रभू, चिंतामणी प्रभू, हडप गुरुजी, सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र परब, गोसावी, माईणकर मॅडम, आचरेकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक अविनाश परब यांनी प्रास्ताविक केले.
प्रमुख पाहुणे प्रा. अरुण मर्गज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर ज्ञानार्जनासाठी करावा, त्याच्या आहारी जाऊ नये, असा सल्ला दिला. “तुमची शिक्षणसंस्था अंधारातून प्रकाशाकडे नेणारा संदेश देणारी आहे. ज्ञान मिळविण्याची प्रत्येक संधी सोन्याची समजून त्याचा लाभ घ्या. विद्यार्थ्यांची प्रगती ही शाळा आणि पालकांचा नावलौकिक वाढवणारी असते,” असे ते म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माजी विद्यार्थी सेवा संस्थेत सहभागी होऊन शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचेही त्यांनी आवाहन केले.
यावेळी आमदार सुनिल प्रभू आणि प्रा. अरुण मर्गज यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गुणगौरव करण्यात आला.
याच कार्यक्रमात उपक्रमशील शिक्षक नरेश कांबळे आणि स्नेहा सरमळकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सायली मोरे यांनी केले, तर केशव सावंत यांनी आभार मानले.







