मालवण | प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील ज्येष्ठ भाजप नेत्या तथा महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्या सौ. रश्मी लुडबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा तथा आमदार चित्रा वाघ यांनी त्यांना प्रदान केले.
प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे की, भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून रश्मी लुडबे यांचा समावेश करताना आनंद होत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी तसेच सरकारच्या जनकल्याणकारी योजना व उपक्रम तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी त्या सक्षमपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
सौ. रश्मी लुडबे यांनी यापूर्वी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच गेल्या सहा वर्षांपासून त्या भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्या म्हणून सक्रियपणे कार्यरत आहेत. संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव, पक्षनिष्ठा आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात आले.
रश्मी लुडबे यांच्या या निवडीबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.







