दांडीत वारकरी दिंडीचा जल्लोष; खैदाच्या ‘प्रती पंढरपूर’मध्ये भाविकांची गर्दी
मालवण | प्रतिनिधी :
आषाढी एकादशीनिमित्त मालवण तालुक्यात शनिवारी सर्वत्र विठ्ठलनामाचा अखंड गजर घुमत भक्तिमय वातावरण निर्माण झाले. दांडी येथील वारकरी दिंडी, खैदा येथील ‘प्रती पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरातील धार्मिक कार्यक्रम तसेच शहर व परिसरातील विविध मंदिरांमध्ये झालेल्या भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि नामस्मरणामुळे संपूर्ण तालुका विठ्ठलभक्तीने दुमदुमून गेला.
दांडी येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटेपासून काकड आरती, पूजाअर्चा, हरिनाम जप आणि भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दुपारी ढोल-ताशे, टाळ-मृदुंगाच्या गजरात श्रीकृष्ण मंदिरातून भव्य वारकरी दिंडीला प्रारंभ झाला. श्री मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) मार्गे दांडेश्वर मंदिरापर्यंत निघालेल्या या दिंडीत शेकडो वारकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालवारकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि “जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल”च्या अखंड जयघोषाने दांडी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
श्री मोरेश्वर येथे ग्रामस्थांनी पारंपरिक धार्मिक विधी व नवसपूर्तीचे कार्यक्रम पार पाडले. त्यानंतर दिंडी दांडेश्वर मंदिरात दाखल झाल्यानंतर हरिनाम सप्ताह, महाआरती आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.
दरम्यान, मालवण तालुक्यातील खैदा येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात, ‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभर पूजाअर्चा, हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडले.
याशिवाय मालवण शहरातील मेढा, देऊळवाडा, गवंडीवाडा, धुरीवाडा तसेच इतर भागांतील श्री विठ्ठल-रखुमाई व श्रीकृष्ण मंदिरांमध्येही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विठ्ठल-रखुमाईच्या चरणी भक्तिभाव अर्पण केला.







