मालवण | प्रतिनिधी :
मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील मेढा परिसरात सुरू असलेल्या गटार बांधकामांची बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हॉटेल आना-नाना ते मुरलीधर मंदिर आणि तेथून रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नरपर्यंत सुरू असलेल्या गटार बांधकामाची त्यांनी पाहणी करत कामाचा दर्जा, गुणवत्ता आणि प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना कामात कोणतीही तडजोड न करता दर्जेदार व टिकाऊ काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासोबतच त्यांचा दर्जाही उच्च प्रतीचा असणे आवश्यक असल्याचे बापर्डेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना सहदेव बापर्डेकर म्हणाले की, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहराच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासाला प्राधान्य दिले जात असून विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत आहे. शहरात अनेक विकासकामे प्रगतीपथावर असून ती दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत, याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही बापर्डेकर यांनी यावेळी सांगितले.







