मालवण : प्रतिनिधी
आडवली-मालडी जिल्हा परिषद गट व शिरवंडे पंचायत समिती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. या निकालामुळे तालुक्यात महायुतीचे राजकीय बळ अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

आडवली-मालडी जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवार व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली सुनील घाडीगावकर यांनी ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार सौ. माधुरी प्रशांत सावंत यांचा ७२२ मतांनी पराभव केला. सौ. घाडीगावकर यांना एकूण ४,०५५ मते मिळाली.
शिरवंडे पंचायत समिती मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार दीपक केशव चव्हाण (बंडू) यांनी ठाकरे शिवसेनेच्या युवराज विजय मेस्त्री यांचा ४८७ मतांनी पराभव करीत विजय संपादन केला. दीपक उर्फ बंडू चव्हाण यांना एकूण २,०५१ मते मिळाली.
यापूर्वी आडवली पंचायत समिती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सौ. सीमा सतीश परुळेकर या बिनविरोध निवडून आल्या होत्या. या सलग यशामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयानंतर समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला.







