नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; नागरिक, पर्यटक आणि मच्छिमारांना मोठा दिलासा
मालवण, प्रतिनिधी : मालवण शहरातील दांडी किनारा आवारवाडी परिसरातील तांत्रिक बिघाडामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला हायमास्ट टॉवर अखेर पुन्हा कार्यान्वित करण्यात आला आहे. स्थानिक नगरसेविका तथा मालवण नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरपरिषदेच्या निधीतून आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून, संपूर्ण परिसर पुन्हा प्रकाशमान झाला आहे.
हायमास्ट टॉवर बंद असल्याने दांडी किनारा परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक, मच्छिमार, पर्यटक तसेच पर्यटन व्यवसायिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. विशेषतः किनारी भागातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या समस्येची गांभीर्याने दखल घेत नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत नगरपरिषदेच्या निधीतून हायमास्ट टॉवरची तांत्रिक दुरुस्ती करण्यात आली आणि तो पुन्हा सुरू करण्यात आला. त्यामुळे दांडी किनारा परिसरात पुन्हा प्रकाश व्यवस्था सुरळीत झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हायमास्ट टॉवर सुरू झाल्यानंतर परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी भाजप मालवण तालुका उपाध्यक्ष सन्मेष परब, नरेश कोयंडे, बाप्पा काळसेकर, मिकी डिसोजा, परेश वाघ, किरण कोयंडे, भूषण काळसेकर, रॉबर्ट फर्नांडिस, बाबू फर्नांडिस यांच्यासह स्थानिक नागरिक, मच्छिमार आणि पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
हायमास्ट टॉवर पुन्हा सुरू झाल्यामुळे दांडी किनारा परिसरातील सुरक्षिततेत भर पडणार असून, रात्रीच्या वेळी नागरिक, पर्यटक आणि पर्यटन व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






