सावंतवाडीसाठी ५६+५६ टर्मिनेटिंग फेऱ्या; रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि मडगावसाठीही विशेष गाड्या जाहीर
मुंबई | प्रतिनिधी :
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. विविध प्रवासी संघटनांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने यंदा कोकणासाठी विशेष गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. विशेषतः सावंतवाडी रोड स्थानकासाठी एकूण ५६+५६ टर्मिनेटिंग फेऱ्या मंजूर करण्यात आल्याने सिंधुदुर्गातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाने मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), पुणे आणि दिवा येथून सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि मडगावपर्यंत विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
सावंतवाडीसाठी विशेष गाड्या
मुंबई CSMT–सावंतवाडी रोड (01103/01104) ही दैनिक विशेष गाडी ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान १६ फेऱ्या, CSMT–सावंतवाडी रोड (01151/01152) दैनिक १७ फेऱ्या, LTT–सावंतवाडी रोड (01171/01172) दैनिक १७ फेऱ्या, LTT–सावंतवाडी रोड (01131/01132) द्वि-साप्ताहिक ४ फेऱ्या, तर LTT–सावंतवाडी रोड (01129/01130) साप्ताहिक २ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
रत्नागिरीसाठी विशेष सेवा
मुंबई CSMT–रत्नागिरी (01153/01154) दैनिक १६ फेऱ्या, LTT–रत्नागिरी (01167/01168) आठवड्यातून पाच दिवस ११ फेऱ्या, तसेच पुणे–रत्नागिरी (01445/01446) आणि (01447/01448) या विशेष गाड्याही निश्चित तारखांना धावणार आहेत.
चिपळूण व खेडसाठी मेमू सेवा
दिवा–चिपळूण (01133/01134) मेमू स्पेशल १५ फेऱ्या, तर दिवा–खेड (01155/01156) मेमू स्पेशल १६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. देखभाल कामामुळे काही दिवशी सेवा बंद राहणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मडगावसाठीही विशेष गाड्या
LTT–मडगाव (01165/01166) आणि (01185/01186) या साप्ताहिक विशेष गाड्यांच्या प्रत्येकी दोन फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही विशेष व्यवस्था केली असून, प्रवाशांनी तिकीट आरक्षण वेळेत करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





