मालवण | प्रतिनिधी
“माझी मालवणी कविता मालवणी मातीतच रुजून आली आहे. त्यामुळेच तिच्यात मालवणी माणसांचे सुख-दुःख, त्यांचा इरसाल स्वभाव आणि जगण्याची खरी चव दिसून येते. दारिद्र्यातही विचारांची श्रीमंती देणारी माझी आई हीच माझ्या प्रत्येक कवितेची प्रेरणा आहे,” असे भावनिक उद्गार मालवणीचे ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो यांनी काढले.
कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा मालवण आणि साने गुरुजी कथामाला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मालवणी भाषेचो कंठो! रुजारिओ पिंटो!’ या विशेष प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. आचरे येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी पिंटो यांची प्रकट मुलाखत घेतली.
मुलाखतीदरम्यान आपल्या बालपणाच्या आठवणी सांगताना रुजारिओ पिंटो भावूक झाले. त्यांनी आपल्या कवितेतील ओळी…
“घर सगळा गळता,
चाय चुलीवरच जळता,
सारे सुखात जेवतत,
आमची भांडी पेवतत…”
…सादर करत, “हेच माझ्या बालपणाचे वास्तव आणि माझ्या आयुष्याचा बोलपट आहे,” असे सांगितले.
प्रारंभी मालवणी कवयित्री सुनंदा कांबळे (विजयदुर्ग) यांनी रुजारिओ पिंटो यांचे स्वागत करत त्यांच्या साहित्य प्रवासाचा परिचय करून दिला.
महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नसले, तरी आज आपल्या मालवणी कविता मुंबई विद्यापीठाच्या बोलीभाषेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याचा अभिमान असल्याचे पिंटो यांनी सांगितले. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आणि ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्यासारख्या दिग्गजांकडून आपल्या साहित्याचा झालेला गौरव हा आयुष्यातील मोठा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी ‘माऊली’ (मराठी), ‘दर्यादेगर’ (कोकणी), ‘आम्ही मालवणी’ आणि ‘गरो फणसाचो’ (मालवणी) या काव्यसंग्रहांच्या निर्मितीमागील प्रेरणा उलगडून सांगितली. तसेच ‘शालग्या’ आणि ‘कायच कळना नाय’ या मालवणी कवितांचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांना खळखळून हसविले.
कोकण मराठी साहित्य परिषद, राष्ट्रीय साहित्य अकादमी, कोकणी सभा आदी विविध बारा साहित्य समित्यांवर काम करताना आलेले अनुभवही त्यांनी यावेळी कथन केले. कोकणी भाषेनंतर आता हिंदीमधील ‘मेरी माँ’ हा त्यांचा कवितासंग्रह लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी सुरेश ठाकूर यांनी चार भाषांमध्ये काव्यलेखन करणारे महाराष्ट्रातील एकमेव कवी म्हणून रुजारिओ पिंटो यांचा विशेष गौरव केला.
कार्यक्रमास कोमसाप शाखा मालवण, साने गुरुजी कथामाला शाखा मालवणचे आजीव सदस्य तसेच साहित्यप्रेमी आणि बहुसंख्य रसिक उपस्थित होते.






