नवी दिल्ली : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ने दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन तात्काळ प्रभावाने मागे घेतल्याची घोषणा शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना सौरव दास म्हणाले, “आमच्या प्रमुख मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. ठरलेल्या अटींची निश्चित वेळेत अंमलबजावणी केली जाईल, या विश्वासावर आणि सद्भावनेच्या भूमिकेतून आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत.”
दास यांनी सांगितले की, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलकांवरील कारवाई मागे घेण्याची मागणीही सरकारने मान्य केली आहे. केवळ दिल्लीतच नव्हे, तर भाजप आणि भाजप समर्थित सरकारे असलेल्या राज्यांमध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे (एफआयआर) मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत आंदोलनादरम्यान सुमारे १५ ते २० एफआयआर दाखल करण्यात आले होते. या सर्व एफआयआरच्या प्रती सरकारकडून तीन ते चार दिवसांत उपलब्ध करून दिल्या जातील, तसेच त्या मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही चर्चेदरम्यान देण्यात आली आहे.
सौरव दास यांनी पुढे सांगितले की, या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात पक्षाने सरकारला लेखी मसुदा (ड्राफ्ट) सादर केला असून तो हमीपत्राच्या स्वरूपाचा आहे. या मसुद्यावर सरकार मंगळवारपर्यंत अधिकृत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आंदोलकांवर भविष्यात कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, याबाबत आवश्यक हमी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आंदोलन मागे घेण्याच्या घोषणेनंतर जंतर-मंतर परिसरातील आंदोलन औपचारिकरीत्या समाप्त करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षा, शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होते.







