मालवण, प्रतिनिधी :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मालवण तालुक्यातील वायरी येथील प.पू. सद्गुरू नामदेव महाराज मठाच्या वतीने आयोजित नामस्मरण पायी दिंडीत सहभागी भाविकांची लायन्स क्लब मालवणच्या वतीने सेवा करण्यात आली. यावेळी भाविकांना अल्पोपाहार आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करून सेवाभाव जपण्यात आला.
या उपक्रमादरम्यान लायन्स क्लब मालवणचे सदस्य काही काळ नामदिंडीसोबत पायी चालत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेत आषाढी वारीच्या सेवेत सहभागी झाले. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सेवाकार्याचे भाविकांनी स्वागत केले.
या सेवाकार्यात लायन्स क्लब मालवणच्या खजिनदार राधिका मोंडकर, ज्येष्ठ सदस्या जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, विनोद शंकरदास यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







