मालवण | प्रतिनिधी :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मालवण तालुक्यातील पळसंब (वरचीवाडी) येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवालयात शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर भजन, कीर्तन, महापूजा तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण अनुभवता येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई देवालय ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता श्री. मंगेश आत्माराम साईल (सहाय्यक आयुक्त, राज्यकर सहयुक्त व्यवसायकर विभाग, वस्तू व सेवाकर भवन, वांद्रे (पूर्व)) यांच्या हस्ते शासकीय महापूजेने होणार आहे.
यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत जुने मात्र वापरण्यायोग्य कपडे संकलित करून ते अनाथाश्रमाला दान करण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दुपारी २ वाजता रवळनाथ प्रफुल्ल भजन मंडळ, आडवली-भटवाडी, दुपारी ३ वाजता श्री जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळ, पळसंब गावठाण आणि दुपारी ४ वाजता भावई प्रासादिक भजन मंडळ, मालडी यांचे सुमधुर भजन होणार आहे.
सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. सौ. आरती सुनिल बापट (नारिंग्रे) यांचे कीर्तन होणार असून त्यांना हार्मोनियमवर श्री. विनोद परब (नारिंग्रे) आणि तबल्यावर श्री. सिद्धेश देवधर (हिंदळे) साथसंगत करणार आहेत.
दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता रात्री ७.३० वाजता श्री विठ्ठल-रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, पळसंब (वरचीवाडी) यांच्या दिंडी भजनाने होणार आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या भक्तिमय आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई देवालय ट्रस्ट, पळसंब (वरचीवाडी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.







