मुंबई : राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने राबविलेल्या ‘गुटखा मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत राज्यभर मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबवून गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. या मोहिमेत १९५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून १९२ जणांना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार धाराशीव, धुळे, नांदेड, पुणे, मुंबईसह विविध जिल्ह्यांत कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत राज्यभरातून १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला.
धाराशीव जिल्ह्यातील परांडा येथे १ कोटी २ लाख ६७ हजार रुपयांचा, समृद्धी महामार्गावरील सावंगी टोलनाका येथे ६० लाख ५० हजार रुपयांचा, तर नांदेडमधील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर १७ लाख ५२ हजार रुपयांचा माल आणि वाहने जप्त करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथेही कारवाई करून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटखा मुक्त महाराष्ट्र ही मोहीम केवळ कायदेशीर कारवाई नसून नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठीची निर्णायक लढाई असल्याचे सांगत, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात शासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण स्वीकारल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
समजून घ्या बातमी
▶ राज्यभर १९५ ठिकाणी एफडीएच्या धाडी
▶ १९२ आरोपींना अटक
▶ १.९९ कोटींचा गुटखा व पानमसाला जप्त
▶ धाराशीवमध्ये १.०२ कोटींचा साठा जप्त
▶ सावंगी टोलनाका येथे ६०.५० लाखांचा माल जप्त
▶ नांदेड सीमेवर १७.५२ लाखांचा साठा पकडला
▶ मोशी येथे ६ जणांविरोधात गुन्हा दाखल
▶ कोकण विभागात सर्वाधिक ७९ धाडी
▶ गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा
▶ ‘गुटखा मुक्त महाराष्ट्र, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग






