ठाणे (प्रतिनिधी)
बहुचर्चित गिरीजा राऊत प्रकरणात मुख्य आरोपी फिरोज शेख याच्या पोलीस कोठडीबाबत आज न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. तपास अधिकारी संदीप धांडे (कापूरबावडी पोलीस ठाणे) यांनी न्यायालयात सांगितले की, गेल्या दोन दिवसांत आरोपी फिरोज शेखची प्रभावी चौकशी करता आली नाही. या प्रकरणातील आणखी एक आरोपी राम यल्लप्पा वडार याला सिंधुदुर्गमधून अटक करण्यात आली असून त्याच्याशी संबंधित तपास पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे.
सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की, फिरोज शेखच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, काळा धागा आणि विविध सुगंधी द्रव्ये जप्त करण्यात आली आहेत. ही सामग्री नेमकी कुठून आणली, त्यामागे कोणाचा सहभाग आहे, तसेच आर्थिक व्यवहारांचा तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले. याशिवाय विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील गावी फिरोज शेख अघोरी विधी करण्यासाठी गेला होता. त्यानंतर सलग पाच गुरुवारी गिरीजा राऊत यांना दर्ग्यात बोलावून लिंबू, पाने, पाणी आणि सुगंधी द्रव्यांच्या माध्यमातून विधी करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यामुळे गिरीजा राऊत यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले.
तपास अधिकाऱ्यांनी आणखी सांगितले की, गुरुवारी आणि शनिवारी दर्ग्यात येणाऱ्या इतर भक्तांवरही अशाच प्रकारचे अघोरी कृत्य झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सिंधुदुर्गात जाऊन तपास करण्यासाठी प्रवासालाच ११ ते १२ तास लागत असल्याने सखोल तपासासाठी फिरोज शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने न्यायालयाकडे केली.
दरम्यान, आरोपी फिरोज शेख यांच्या वकिलांनी पोलिसांच्या मागणीला विरोध केला. फिरोज शेख यांना यापूर्वी दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. आठ वर्षांनंतर हे प्रकरण समोर का आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दर्ग्यात पाणी अर्पण करणे, पोथी वाचणे किंवा धार्मिक विधी करणे हा गुन्हा ठरू शकत नाही. दर्ग्यात लिंबू आणि पाणी सापडल्याने त्यातून संशय निर्माण होत नाही, असा युक्तिवाद करत फिरोज शेख यांना न्यायालयीन कोठडी (MCR) देण्याची मागणी त्यांनी केली.
दुसरीकडे, गिरीजा राऊत यांच्या वकिलांनी पोलिसांच्या भूमिकेला पाठिंबा देत दर्ग्यातून लिंबू, पाणी, सुगंधी द्रव्ये आणि टाचण्या जप्त झाल्याचे निदर्शनास आणले. या साहित्याचा वापर जादूटोणा आणि अघोरी विधीसाठी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी आणि सर्व पैलूंचा तपास करण्यासाठी फिरोज शेख यांना आणखी काही दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.







