श्री देवी सातेरी जलमंदिराच्या जत्रोत्सवाला हजारो भाविकांची अलोट गर्दी; ओटी भरण्यासाठी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
मालवण, प्रतिनिधी : “जय देवी सातेरी…”च्या अखंड जयघोषाने रविवारी बिळवस गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. कोकणातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी सातेरी जलमंदिराचा वार्षिक जत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण मंदिर परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणाने भारावून गेला होता.
जत्रोत्सवानिमित्त श्री देवी सातेरी जलमंदिराचा गाभारा, मंदिर परिसर आणि सभामंडप आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. देवीला पारंपरिक वस्त्रालंकारांनी आणि दागिन्यांनी सुशोभित करण्यात आले होते.
सकाळी आठ वाजल्यापासून देवीची ओटी भरण्यास प्रारंभ झाला. विशेषतः महिलांनी आणि माहेरवाशिणींनी मोठ्या भक्तिभावाने ओटी भरत देवीचे दर्शन घेतले. दुपारी साडेबारा ते एक या वेळेत देवीला महाप्रसादाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर भाविकांचा ओघ आणखी वाढल्याने संपूर्ण देवालय परिसर गर्दीने फुलून गेला. जत्रेनिमित्त मंदिर परिसरात ओटी साहित्य, पूजासाहित्य, मिठाई, खेळणी तसेच विविध पारंपरिक वस्तूंची दुकाने आणि स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामुळे जत्रेला पारंपरिक ग्रामीण उत्सवाचे रंगतदार स्वरूप प्राप्त झाले.
भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्टने सुयोग्य नियोजन केले होते. स्वागत कक्षातून भावेश पालव यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे सातत्याने सूचना देत दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवली. रांग व्यवस्थापनाचे नियोजन प्रभावीपणे करण्यात आल्याने भाविकांना कमी वेळेत देवीचे दर्शन घेता आले. सभामंडपाबाहेरच रांगांचे नियोजन केल्यामुळे मंदिर परिसरात कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नाही.
जत्रोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मालवण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन केले. मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर एकदिशा वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आल्याने दिवसभर कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही.
एस.टी. महामंडळाने मसुरे येथून जत्रा विशेष बससेवा उपलब्ध करून दिल्याने दूरवरून आलेल्या भाविकांची मोठी सोय झाली. देवालय परिसरात प्रशस्त वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. वाहतूक नियंत्रणासाठी स्वयंसेवक दिवसभर कार्यरत होते. अखंड वीजपुरवठ्यासाठी महावितरणचे कर्मचारी सज्ज होते, तर प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे, उपकेंद्र बिळवस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली.
भक्ती, परंपरा आणि उत्कृष्ट नियोजनाचा सुंदर संगम अनुभवत हजारो भाविकांनी श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. शांतता, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा जत्रोत्सव बिळवसच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाची पुन्हा एकदा प्रचिती देऊन गेला.






