वैभववाडी प्रतिनिधी:
नाधवडे येथे बंद असलेल्या बंगल्यावर अज्ञात चोरट्यांनी धाडसी डल्ला मारत लाखोंच्या ऐवजावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
नाधवडे-शिडवणे रोडलगत परशुराम इसवलकर यांचा नवीन बंगला असून सध्या ते तेथे वास्तव्यास नसल्याने बंगला बंद होता. तीन दिवसांपूर्वी सर्व काही सुरळीत असताना, शनिवारी दुपारी बंगल्याकडे गेल्यावर मुख्य दरवाजा तोडलेला आढळून आला. घरात प्रवेश करताच चोरीचे भीषण चित्र समोर आले.
चोरट्यांनी घरातील फ्रिज, इन्व्हर्टर, गॅस सिलेंडर, किमती भांडी, बाथरूममधील नळ, तसेच विविध प्रकारच्या लाईट्स असा मोठ्या प्रमाणावर ऐवज लंपास केला. एवढेच नव्हे तर बंगल्याची मोठ्या प्रमाणात नासधूस देखील करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया बांगाडे, फक्रुद्दीन आगा आणि संदीप कांबळे यांनी पंचनामा करत तपास सुरू केला. श्वानपथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच वैभववाडी बाजारपेठेत दोन बंद घरे फोडण्याचा प्रयत्न आणि मोटारसायकल चोरीची घटना घडली होती. त्यानंतर आता नाधवडे येथे झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या सलग घटनांमुळे पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.






