सावंतवाडी : शेअर मार्केट घोटाळा आणि खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील मुख्य संशयित सागर कारिवडेकर याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशीसाठी कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
सागर कारिवडेकर हा गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता. सावंतवाडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारिवडे परिसरात सापळा रचून काल रात्री त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
कारिवडेकर याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप असून, गुंतवणूकदारांवर आपल्या साथीदारांमार्फत हल्ला केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. तसेच ठाणे आणि मुंबई येथे आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या पोलिस कोठडीदरम्यान खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यासह इतर प्रकरणांबाबत सखोल चौकशी केली जाणार आहे. पुढील कारवाई ठाणे पोलिसांकडून केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यापूर्वीही सागर कारिवडेकर याच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.






