पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) नव्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात मालवणी आणि वऱ्हाडी बोलीभाषांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील विविध बोलीभाषांचे संवर्धन आणि विद्यार्थ्यांना स्थानिक भाषिक वैविध्याची ओळख करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवी पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली असून १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून ती लागू होणार आहेत.
‘बालभारती’च्या मराठी विषयाच्या विशेषाधिकारी सविता वायाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहावीच्या पाठ्यपुस्तकात मालवणी आणि वऱ्हाडी बोलीभाषेतील निवडक उतारे तसेच संबंधित लेखकांचा परिचय देण्यात आला आहे. जुन्या अभ्यासक्रमातही बोलीभाषांतील कविता आणि पाठांचा समावेश होता. त्याला शिक्षक आणि तज्ज्ञांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने नव्या अभ्यासक्रमातही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.
नव्या धोरणानुसार पहिली ते दहावी या सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये टप्प्याटप्प्याने बोलीभाषांचा समावेश केला जाणार आहे. तसेच अकरावी आणि बारावीच्या पाठ्यपुस्तकांतही बोलीभाषांना स्थान देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती बालभारतीकडून देण्यात आली.
समजून घ्या बातमी-
▶ सहावीच्या पुस्तकात मालवणी आणि वऱ्हाडीचा समावेश
▶ बोलीभाषेतील उतारे आणि लेखक परिचय समाविष्ट
▶ १५ जूनपासून नवी पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती
▶ दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवी पाठ्यपुस्तके
▶ पहिली ते दहावीपर्यंत बोलीभाषांचा टप्प्याटप्प्याने विस्तार
▶ शिक्षक आणि तज्ज्ञांचा सकारात्मक प्रतिसाद
▶ स्थानिक भाषिक वारशाचे संवर्धन हा उद्देश
▶ अकरावी-बारावीमध्येही बोलीभाषांचा विचार
▶ पुढील वर्षी पाचवी, सातवी, नववी, अकरावीची नवी पुस्तके
▶ मालवणी भाषेला शालेय शिक्षणात नवे स्थान मिळणार!







