मालवण (प्रतिनिधी)
मालवणात अंमली पदार्थांच्या रॅकेटचा सुळसुळाट सुरु असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु असतानाच आज मालवण पोलीसांनी मालवणात कुंभारमाठ व मेढा अशा दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात दोन संशयित युवकांना गांजाच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून दोन्ही युवकांच्या अटकेची कार्यवाही सुरु होती.
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आज मालवण पोलिसांच्या पथकाने मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप व उपनिरीक्षक एस. एस. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहरात दोन ठिकाणी छापे टाकले. यामध्ये मालवण कुंभारमाठ येथे जरीमरी मंदिराजवळ टाकलेल्या छाप्यात राजन गणेश चव्हाण (वय २६, रा. वायरी भरड, मालवण) या युवकाला पोलीसांनी ताब्यात घेतले, त्याच्याकडे पोलिसांना गांजाचा साठा सापडून आला. तसेच मालवण शहरातील मेढा येथील काळबादेवी मंदिर नजीक टाकलेल्या छाप्यात सेबेस्तीयन विल्सन फर्नांडिस (वय २५, रा. कुंभारमाठ मालवण) या युवकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडेही गांजा सापडून आला.
पकडण्यात आलेल्या दोन्ही संशयित युवकांवर अंमली पदार्थ विरोधी कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्यांच्यावर अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्याकडे हा गांजा कुठून आला आणि ते तो कोणाला विकणार होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
यापूर्वीही मालवण परिसरात गांजा पकडण्याच्या कारवाया झाल्या आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मालवणात अमली पदार्थांचे जाळे पसरू नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी पुन्हा एकदा ही धडक कारवाई करून अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत.







