Former Zilla Parishad President Ashok Sawant expresses confidence that Mahayuti candidates will win across Sindhudurg in the Zilla Parishad and Panchayat Samiti elections, citing development work and strong leadership at the center, state and district levels.
मालवण | प्रतिनिधी
केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवर महायुती सक्षमपणे काम करत असल्याने येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी जि.प. अध्यक्ष अशोक सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, १९९० पासून आपण कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आहोत. १९९० पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा, साकव यांसारख्या मूलभूत सुविधा अत्यंत तोकड्या होत्या. त्या काळात या भागाचे आमदार म्हणून नेतृत्व करणाऱ्या नारायण राणे यांनी पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आणि ते यशस्वी करून दाखवले.
या भागाचा विकास होण्यासाठी दरडोई उत्पन्न वाढणे अत्यावश्यक आहे, हा विचार घेऊन खासदार नारायण राणे यांनी काम केले असून आजही त्याच विकासाभिमुख धोरणांमुळे सिंधुदुर्गाचा सर्वांगीण विकास होत असल्याचे विरोधकही मान्य करत असल्याचे अशोक सावंत यांनी नमूद केले. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादामुळे आपण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करू शकलो आणि या काळात फक्त घोषणा न करता रस्ते, पाणीपुरवठा योजना, शाळा, आरोग्य केंद्रे यांसारखी ठोस विकासकामे प्रत्यक्षात उतरवली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुती ही केवळ पक्षांची बेरीज नसून हिंदुत्व, विकास आणि स्थैर्याचा मजबूत गठ्ठा आहे, असे सांगताना सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध योजना गावागावात पोहोचल्या आहेत. घरकुल योजना, जलजीवन मिशन, रस्ते, वीज, महिला सक्षमीकरण यांसारख्या योजनांमुळे ग्रामीण भागात मोठा बदल घडून आला आहे.
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, आज विरोधकांकडे काम नाही, फक्त आरोप आणि अफवा आहेत. जनतेशी नाळ तुटलेली असून त्यांना केवळ सत्तेची हाव आहे. त्यामुळे या निवडणुकीत अशा लोकांना ‘क्लीन बोल्ड’ करण्याची वेळ आली आहे. महायुतीने महिलांना केवळ मतदार म्हणून न पाहता सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन दिले आहे. बचत गट, ‘लाडकी बहीण’ योजना, आरोग्य सुविधा, रस्ते, बाजारपेठा, पाणी व वीज सुविधा यांद्वारे महायुतीने थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम केले आहे. केवळ भाषणांपुरते न राहता धरणे, बंधारे व सिंचन सुविधा उभारून शेतीला बळ दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेवटी अशोक सावंत म्हणाले की, ही निवडणूक केवळ ‘बटण दाबण्याची’ नाही तर भविष्यासाठी दिशा ठरविण्याची आहे. या संधीचा उपयोग करून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.







