BJP North Mumbai felicitates newly elected BMC BJP Group Leader Ganesh Khankar. District Secretary Yogesh Padwal praises his work and expresses confidence in his role in Mumbai’s development.
मालवण | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबईच्या वतीने मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे नवनिर्वाचित गटनेते गणेश खणकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. उत्तर मुंबई जिल्हा सचिव योगेश पडवळ यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन हा सत्कार समारंभ संपन्न झाला. या वेळी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
उत्तर मुंबई जिल्हा सचिव योगेश पडवळ यांनी आपल्या मनोगतात गटनेते गणेश खणकर यांनी आजवर केलेल्या कार्याचे कौतुक केले. मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या वतीने प्रभावी नेतृत्व करत मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी गणेश खणकर योग्य भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने मुंबईतील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारणाची दिशा कायम ठेवली असून, आगामी काळात मुंबईतील नागरी सुविधा, पायाभूत विकासकामे, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या सत्कारप्रसंगी जिल्हा अध्यक्ष नगरसेवक बाळा तावडे, जिल्हा सरचिटणीस बाबा सिंह, निखिल व्यास, कमलेश यादव, प्रमोद घाग, संजय सिंह यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित गटनेते गणेश खणकर यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित गटनेते गणेश खणकर यांनी सत्कार स्वीकारताना पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. मुंबईकरांच्या हितासाठी पारदर्शक, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामकाज करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भाजप कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मुंबई महानगरपालिकेत नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.







