मालवण (प्रतिनिधी)
आडवली–मालडी पंचायत समिती मतदार संघातून भाजपच्या उमेदवार व माजी सभापती सौ. सीमा सतीश परुळेकर या बिनविरोध निवडून आल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विजयाला भाजप–शिंदे शिवसेना महायुतीचा विजय असल्याची प्रतिक्रिया भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.
सीमा परुळेकर यांच्या बिनविरोध निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. चिंदरकर म्हणाले की, हा विजय महायुतीच्या एकजुटीचे फलित आहे. खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे आणि आमदार नीलेश राणे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मालवण तालुक्यात महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आजचा हा पहिला विजय म्हणजे आगामी यशाची सुरुवात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिंधुदुर्गातील जाहीर सभा या विजयोत्सवाच्याच ठरणार आहेत, असा विश्वासही श्री. चिंदरकर यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, महेंद्र चव्हाण, महेश मांजरेकर, अरूण मेस्त्री, सुमीत सावंत, दया हाटले, भाई घाडीगावकर, शुभम मठकर, संतोष बाईत, विजय निकम, सुभाष लाड, दिपक सुर्वे, राजू परुळेकर, संतोष पाताडे आदी भाजप व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







