मालवण दि. प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले ठाकरे शिवसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे एकमेकांसमोर उभे ठाकल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात पार पडलेल्या मालवण नगरपालिका निवडणुकीत ठाकरे शिवसेना व काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. मात्र आता पंचायत समिती निवडणुकीत तीन ठिकाणी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे.
मालवण तालुक्यातील चिंदर पंचायत समिती मतदार संघातून काँग्रेसने महेंद्र मांजरेकर यांना उमेदवारी दिली असून आचरा पंचायत समिती मतदार संघात प्रवीण आचरेकर हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहेत. तसेच वायरी भूतनाथ पंचायत समिती मतदार संघात वायरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे हे काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एकूणच पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने प्रथमच मालवण तालुक्यात आपला उमेदवार उभा केल्याने निवडणूक अधिकच चुरशीची ठरली आहे. सुकळवाड जिल्हा परिषद मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या गौतमी तळगावकर या निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्यांची लढत शिंदे शिवसेनेच्या उमेदवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. सुमेधा पाताडे यांच्याशी होत आहे.
याच मतदार संघात ठाकरे शिवसेनेच्या पूजा चव्हाण यांनीही उमेदवारी दाखल केल्याने सुकळवाड जिल्हा परिषद मतदार संघात तिरंगी लढत होत आहे. सहा जिल्हा परिषद मतदार संघांपैकी केवळ सुकळवाड मतदार संघात तिरंगी लढत होत असल्याने ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली आहे. एकूणच मालवण तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत बदललेल्या आघाड्या आणि नव्या पक्षांच्या प्रवेशामुळे राजकीय वातावरण तापले आहे.







