मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे शिवसेना ताकदीने लढाई देणार असून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर ठाकरे शिवसेनेचाच झेंडा फडकणार, असा ठाम विश्वास ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी श्री. खोबरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ठाकरे शिवसेनेच्या काही इच्छूक उमेदवारांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र पक्षाने त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून समजूत काढल्यानंतर संबंधित उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
आता तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवार एकसंघपणे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले असून निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत, असेही खोबरेकर यांनी स्पष्ट केले. संघटनात्मक बळ, कार्यकर्त्यांची एकजूट आणि जनतेचा पाठिंबा याच्या जोरावर ठाकरे शिवसेना या निवडणुकीत निश्चितच यश मिळवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.







