सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांमध्ये मतांसाठी खुलेआम पैशांची उधळण झाल्याच्या आरोपांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका मतासाठी तब्बल १५ हजार ते ४६ हजार रुपयांपर्यंत बोली लागल्याची चर्चा असतानाच, आता ग्रामीण भागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचे प्रत्यंतर एका निनावी बॅनरमधून आले असून, त्याने सर्वच राजकीय पक्षांची कोंडी केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशासन या बॅनरवर तात्काळ कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय.
“समान मत, समान किंमत..!” असा ठळक मजकूर असलेल्या या बॅनरमधून शहरी मतदारांना पैसे वाटले गेले, मग ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय का? असा थेट आणि बोचरा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ‘शहरातील मतदारांना १५ हजार रुपये देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये,’ असा स्पष्ट इशारा या बॅनरमधून देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना अशा स्वरूपाचे बॅनर लागल्याने राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. लोकशाहीची थट्टा करणाऱ्या ‘पैशाच्या राजकारणा’विरोधात आता गावकऱ्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली असून, ‘लाडका मतदार योजना’ ग्रामीण भागातही लागू होणार का, असा उपरोधिक सवाल विचारला जात आहे.
या प्रकारामुळे ‘कॅश फॉर व्होट’ हा विषय पुन्हा ऐरणीवर आला असून, आगामी निवडणुकांमध्ये पैशाच्या वापरावर नियंत्रण ठेवणे हे प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान, निनावी बॅनरमागे नेमके कोण आहे, याचा शोध घेण्याची चर्चा सुरू असली तरी या बॅनरने राजकीय पक्षांचा माज उतरवल्याची भावना सर्वसामान्य मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.






