पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याची तीव्र नाराजी सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत महिलांनी राजकारणात प्रवेश करायचा तरी कशासाठी, असा थेट आणि परखड सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
साक्षी वंजारी म्हणाल्या की, काँग्रेससह विविध राजकीय पक्षांकडून महिलांना नेतृत्वाची संधी देण्याची भूमिका वारंवार मांडली जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी निष्ठावंत महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक काळात तसेच संघटनात्मक कामकाजात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीची दखल घेतली जात नाही.
पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांऐवजी संधीसाधू, तसेच पक्षाशी फारसा संबंध नसलेल्या व्यक्तींना पुढे आणले जात असल्यामुळे खऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. “महिला कार्यकर्त्या घर, कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत पक्षासाठी वेळ देतात. प्रचार, संघटन, आंदोलने आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्या नेहमीच आघाडीवर असतात. मात्र निर्णयप्रक्रियेत त्यांना डावलले जाते,” अशी खंत वंजारी यांनी व्यक्त केली.
हा अन्याय कायम राहिला तर महिलांचा राजकारणातील सहभाग कसा वाढणार, असा सवाल करत त्यांनी पक्ष संघटनेत पारदर्शकता आणि न्याय्य निर्णयप्रक्रियेची गरज अधोरेखित केली. जिल्हा व तालुका पातळीवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना योग्य सन्मान, जबाबदाऱ्या आणि संधी मिळाल्याशिवाय संघटना मजबूत होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केवळ आश्वासनांवर प्रामाणिक कार्यकर्त्यांचा वापर करून घेतला जात असेल, तर राजकारणात चांगली माणसे येणार तरी कशी, असा थेट सवाल उपस्थित करत साक्षी वंजारी यांनी पक्ष नेतृत्वाने या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.







