मालवण दि (प्रतिनिधी)
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया, आदिशक्ती भवानी माता आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक, पारंपरिक त्रैवार्षिक किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळ्यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर आपल्या इतर वारेसुत्र, पालखी, तरंग, राणे, परब मानकरी, गावघर व स्थत मंडणासह किल्ले सिंधुदुर्ग, मालवण येथे शुक्रवार २३ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. कांदळगाव येथून रवाना होणार आहेत. या सोहळ्यासाठी मालवणवासीय सज्ज झाले असून कांदळगाव ते मालवण बंदर जेटीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी देवांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. रांगोळ्या, भगवे ध्वज, स्वागत कमानी, गुढ्या यांनी कांदळगाव ते मालवण मार्ग सजून गेला आहे.
कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर उद्या दि. २३ रोजी सिंधुदुर्ग किल्ला भेटीवर निघणार आहे. कांदळगाव येथून ओझर ते कोळंब ते मालवण बंदर जेटी व तेथून सिंधुदुर्ग किल्ला अशी श्री देव रामेश्वराची मार्गक्रमणा आहे. रामेश्वराच्या स्वागतासाठी कांदळगाव मध्ये मार्गावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर भव्य रांगोळ्या व सडे काढण्यात आले आहेत. ओझर, खडवण नाका, कोळंब, धुरीवाडा तसेच मालवण शहरात ठिकठिकाणी रामेश्वराचे स्वागत करण्यात येणार असून यासाठी मंडप व स्वागत कमानी उभारून सजावट करण्यात आली आहे. रस्त्यावर रांगोळ्या, रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताका, आकर्षक गुढ्या उभारून सजावट करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहार व सरबत व्यवस्था करण्यात येणार आहे. या भेटी दरम्यान रामेश्वर ज्या ज्या ठिकाणी भेटी देणार अशा मेढा येथील जोशी मांड, किल्ले सिंधुदुर्ग, दांडी येथील दांडेश्वर मंदिर, मेढा मौनीनाथ मंदिर, कुशे वाडा, बाजारपेठ रामेश्वर मांड, कोळंब अशा विविध ठिकाणी जय्यत तयारी व भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
दि २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वा. देव रामेश्वर आपल्या पंचायतन, वारेसुत्र, पालखी, तरंग व भाविक रयतेसह मालवण जोशी मांड येथे मार्गस्थ होणार. दुपारी १२ वा. जोशीमांड मेढा, मालवण येथे उपस्थितांना अल्पोपहार, नंतर समुद्रमार्गे होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे प्रवास. पुढे किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात देव रामेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासीक भेट सोहळा. पुढे भवानी माता मंदिर येथे श्री देव रामेश्वर आणि आदीमाया, आदिशक्ती आई भवानी यांचा भेट सोहळा. नंतर रितीरिवाजाची कामे. सायं. ४ वा. किल्ले दांडेश्वर मंदिर, दांडी येथे होडीतून परतीचा प्रवास. दांडी मालवण येथे पोहोचल्यावर सर्व भाविकांना दांडी गावातर्फे चहापाणी आणि थंडगार शितपेय वाटप. नंतर तेथून मौनीनाथ मंदिर-मेढा मालवणच्या दिशेने मार्गक्रमण, रात्री मौनीनाथ मंदिरात पोहोचल्यावर त्या दिवसाची सांगता. पालखीचा तेथे मुक्काम, उपस्थित सर्वांसाठी मौनीनाथ मंदिर व कुशेवाडा येथे महाप्रसाद होणार आहे.
शनिवार २४ रोजी सकाळी ८ वा. मौनीनाथ मंदिरात पारंपरिक विधीवत पूजा-अर्चा झाल्यानंतर भाविकांना आशीर्वचन देऊन श्री देव रामेश्वर आणि सर्व वारेसुत्र, पालखी, तरंग पुढे कुशेवाडा येथे मार्गस्थ होतील. कुशेवाडा येथे पोहोचल्यावर प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबियांना पारंपरिक भेट व आशीर्वचन देऊन रितीरिवाजाची कामे पूर्ण करून पालखी पुढे रामेश्वर मांड, मालवण बाजारपेठ येथे मार्गस्थ होईल. दुपारी १ वा. रामेश्वर मांड, बाजारपेठ मालवण येथे भाविकांना दर्शन व आशीर्वचन, त्यानंतर रामेश्वर मांड मंडळातर्फे उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी आणि भंडारी हायस्कूलच्या पाठीमागील हॉलमध्ये भाविकांना महाप्रसादाचे आयोजन. तेथून रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर, कांदळगावला परतीचा प्रवास. सायं. ४ नंतर, रात्री ८ वा. देव महापुरुष देवस्थान (मांगरी) कोळंब येथे पालखी, तरंग यांचे त्या दिवसासाठी विसर्जन आणि मुक्काम. नंतर गणेश (अवि) नेरकर यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन. नंतर कांदळगावला जाणाऱ्या भाविकांसाठी नेरकर यांच्यामार्फत मोफत वाहनांची सोय करण्यात आली आहे.
रविवार, २५ रोजी दुपारी १ वा. व रात्री १० वाजता कोळंब महापुरुष देवस्थान येथे महाप्रसाद, नंतर आशीर्वचन देऊन देव रामेश्वर, इतर वारेसुत्र, पालखी, तरंग, भाविक आणि गावघर, कांदळगाव स्वगृही परतीच्या प्रवासाला निघणार. वाटेत आशीर्वचन देत देत रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथे या ऐतिहासीक तीन दिवसीय सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, कांदळगाव, मानकरी व ग्रामस्थांनी दिली आहे.






