मुंबई (प्रतिनिधी)
मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर आता राज्यभराचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. महापालिका निवडणुकांनंतर सत्तास्थापनेचा पुढचा टप्पा म्हणून महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत कधी काढली जाणार, याबाबत उत्सुकता होती. नगरविकास खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाण्याची शक्यता असून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महापौर निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर महापौरपदाचे आरक्षण हा लोकशाहीतील सर्वसमावेशकतेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच कोणत्या प्रवर्गातील नगरसेवक महापौर बनू शकतो, हे स्पष्ट होते. त्यामुळे सध्या सर्वच पक्षांतील इच्छुकांनी आपापल्या पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आरक्षण सोडतीची पद्धत
महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण हे चक्रानुसार (Rotation Policy) ठरवले जाते. यामध्ये राज्य सरकारकडून सोडत (Lottery) काढली जाते. याचे मुख्य नियम खालीलप्रमाणे असतात:
सर्वसमावेशकता: अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिक मागास प्रवर्ग (OBC) आणि महिला (सर्व प्रवर्ग) यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आणि नियमानुसार प्रतिनिधित्व दिले जाते.
बदलाचा नियम: जर मागील वेळी एखादे पद ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी असेल, तर या वेळी ते इतर राखीव प्रवर्गासाठी जाण्याची शक्यता जास्त असते, जेणेकरून सत्तेचे समान वाटप होईल.
महिला आरक्षण: एकूण जागांपैकी ५०% पदे महिलांसाठी आरक्षित असतात, त्यामुळे २९ पैकी निम्म्या महापालिकांमध्ये महिला महापौर पाहायला मिळतील.
महापौर आरक्षणाची पद्धत
महापौरपदाचे आरक्षण चक्रानुसार (रोटेशन पॉलिसी) ठरवले जाते. राज्य सरकारकडून सोडत काढून हे आरक्षण निश्चित केले जाते. या प्रक्रियेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिक मागास प्रवर्ग (OBC) तसेच सर्व प्रवर्गांतील महिलांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जाते. मागील वेळेस ज्या महापालिकेत महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते, तेथे यावेळी राखीव प्रवर्गासाठी जाण्याची शक्यता अधिक असते. तसेच एकूण महापौरपदांपैकी ५० टक्के पदे महिलांसाठी आरक्षित असल्याने २९ पैकी किमान निम्म्या महापालिकांत महिला महापौर दिसण्याची शक्यता आहे.
मुंबईत महापौर नेमका कुणाचा ?
राज्यातील नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेसह २५ महापालिकांवर महायुतीची सत्ता आली आहे. मुंबई महापालिकेतील २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे एकूण ११८ नगरसेवक निवडून आले. यामध्ये भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकत आघाडी घेतली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ६५, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे २९, मनसेचे ६, शरद पवार गटाचा १, अजित पवार गटाचे ३, तर इतर पक्षांचे २ नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय एमआयएमचे ८ नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपच्या सर्वाधिक संख्याबळामुळे मुंबईत भाजपचाच महापौर होणार, हे जवळपास निश्चित मानले जात असले तरी उबाठा आणि शिंदे गटाच्या राजकारणाला आलेला जोर यामुळे व्टिस्ट वाढला आहे.
राज्यातील संख्याबळ
राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक १४२५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे गटाचे ३९९, काँग्रेसचे ३२४, अजित पवार गटाचे १६७, शिवसेना ठाकरे गटाचे १५५, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ३६, मनसेचे १३, बहुजन समाजवादी पक्षाचे ६ आणि एमआयएमचे १२५ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपने राज्यभरात सर्वाधिक यश मिळवल्याने पक्षात जल्लोषाचे वातावरण आहे.
पुढील टप्पे
महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विभागीय आयुक्तांकडून महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यानंतर पात्र प्रवर्गातील नगरसेवकांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्यास महापालिकेच्या सभागृहात मतदान घेऊन महापौरांची निवड केली जाईल.
एकूणच, आरक्षण जाहीर होईपर्यंत राज्यातील २९ महापालिकांतील सत्तास्थापनेचा सस्पेन्स कायम राहणार असून, महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.







