मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरात मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून रविवारी सकाळी बाजारपेठ परिसरात घडलेल्या घटनेने या समस्येचे गांभीर्य पुन्हा अधोरेखित झाले आहे. बाजाररहाटीसाठी आलेल्या एका महिलेला रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांनी धडक दिल्याने ती महिला जखमी झाली आहे.
मालवण शहरात मोकाट गुरे तसेच भटके कुत्रे यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. आज सकाळी बाजारपेठेत गर्दी असताना अचानक मोकाट गुरे धावत आल्याने संबंधित महिलेला जोरदार धडक बसली. या धडकेत महिलेला दुखापत झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच जखमी महिलेच्या नातेवाईकांनी मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उपनगराध्यक्ष पाटकर यांनी तात्काळ नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले.
यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक संजय पवार तसेच आरोग्य विभागाचे लिपिक मंदार केळूसकर यांना स्पष्ट सूचना दिल्या. मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही अधिक प्रभावी करावी व तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे त्यांनी सांगितले. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडेही गांभीर्याने लक्ष देऊन आगामी काळात अधिक गतिमान पद्धतीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, नगरपरिषद प्रशासनाने यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







