मुंबई / सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठोस पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी गरज पडल्यास त्या ठिकाणी आघाडीतील मित्र पक्षांसोबत मैत्रीपूर्ण लढत द्यावी, अशी स्पष्ट भूमिका प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकांबाबत राज्यस्तरीय आढावा बैठक रविवारी मुंबईतील टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीत राज्यभरातील राजकीय परिस्थिती, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक आढावा तसेच निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, प्रदेश सचिव तौफिक मुलानी, प्रदेश कार्यालयीन प्रभारी नामदेव चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या कार्याचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, कार्यकर्त्यांचे काम, जनाधार तसेच मित्र पक्षांची भूमिका यावरही सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन करताना, स्थानिक कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपून निर्णय घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना योग्य संधी देण्यासाठी प्रदेश नेतृत्व सकारात्मक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.








