मुंबई (प्रतिनिधी) –
सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या आणि अनेक वर्षांनंतर होत असलेल्या राज्यातील मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. राज्यभरातील ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करणार आहेत.
सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात होऊन ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालेल. मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून दुपारपर्यंत निकालाचे स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे
यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत, तर काही महापालिकांत सत्ताधारी आणि विरोधकांनी अनपेक्षित युती करत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून राज्यातील महानगरांवर कोणाचा वरचष्मा राहणार, याचा फैसला मतदार करणार आहेत.
या महापालिकांकडे विशेष लक्ष
मुंबई – तब्बल १९ वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू यांच्याविरोधात भाजप आणि शिंदेसेनेची महायुती अशी थेट लढत होत असल्याने मुंबईकरांचा कौल कुणाला मिळणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड – या दोन्ही महापालिकांत अजित पवार आणि शरद पवार ही काका–पुतण्याची जोडी भाजपच्या विरोधात एकत्र आल्याने निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली आहे.
नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमपिच असलेली नागपूर महापालिका भाजपचा बालेकिल्ला मानली जाते. त्यामुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे.
नाशिक – सातत्याने झालेल्या पक्षांतरांमुळे आणि भाजपमधील अंतर्गत मतभेदांमुळे नाशिक महापालिकेची निवडणूक चर्चेत राहिली आहे.
छत्रपती संभाजीनगर – अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या या महापालिकेवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम स्वबळावर लढत आहेत.
कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई – येथे भाजप आणि शिंदेसेना यांच्यात अटीतटीची लढत आहे. नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध भाजपचे मंत्री गणेश नाईक, तर कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटाचे प्राबल्य राहणार की भाजपचे रवींद्र चव्हाण याचा फैसला मतदार करणार आहेत.
तांत्रिक अडचणींसाठी ‘पाडू’ची व्यवस्था
मुंबई महापालिका निवडणुकीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बेल) निर्मित मतदान यंत्रांमध्ये मतमोजणीदरम्यान तांत्रिक अडचण उद्भवल्यास ‘पाडू’ (प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) या सहाय्यक यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, ‘पाडू’चा वापर सरसकट केला जाणार नसून केवळ अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच तो केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मुंबईसाठी १४० ‘पाडू’ यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘पाडू’ हे स्वतंत्र मतदान यंत्र नसून आधीच नोंदवलेल्या मतांची माहिती प्रदर्शित करण्यासाठी वापरले जाणारे सहाय्यक उपकरण आहे.
ईव्हीएमची सज्जता
निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएमची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये ४३ हजार ९५८ कंट्रोल युनिट आणि ८७ हजार ९१६ बॅलेट युनिटचा समावेश आहे.
“मोठ्या संख्येने मतदान करा. आपले मत आपल्या शहराचे भवितव्य ठरवू शकते. लोकशाहीतील हा आपला महत्त्वाचा हक्क आहे आणि तो आपण बजावायलाच हवा,” असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.







