मुंबई (प्रतिनिधी) –
राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिका (बीएमसी) निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गुरुवारी, १५ जानेवारी रोजी मुंबई महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, यंदा मुंबई महापालिकेच्या मतमोजणी प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आल्याने सर्व निकाल एकाच वेळी जाहीर होणार नाहीत.
२०१७ च्या निवडणुकीप्रमाणे यंदा मुंबईतील २२७ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी केली जाणार नाही. याऐवजी यंदा मतमोजणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. शुक्रवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून ही प्रक्रिया एकूण पाच टप्प्यांत पार पडणार आहे. प्रत्येक टप्प्यात साधारण ४६ प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे.
मुंबई शहरात एकूण २३ मतमोजणी केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक केंद्रावर सुमारे दहा प्रभागांची जबाबदारी एका मतमोजणी अधिकाऱ्याकडे असणार असली, तरी एका वेळी केवळ दोनच प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकाच वेळी जास्तीत जास्त ४६ प्रभागांचेच निकाल स्पष्ट होणार आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या नव्या पद्धतीमुळे उपलब्ध मनुष्यबळ कमी प्रभागांवर केंद्रित करता येणार असून, मतमोजणी अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडणे शक्य होणार आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे सर्व प्रभागांचे कल एकाच वेळी समोर येणार नाहीत. काही वॉर्डांचे निकाल सकाळीच जाहीर होतील, तर काही वॉर्डांचे निकाल दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
या पाच टप्प्यांच्या फॉर्म्युल्यामुळे यंदा मुंबई महापालिकेच्या अंतिम सत्तासमीकरणासाठी नागरिकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोणत्या प्रभागाचा निकाल आधी आणि कोणाचा उशिरा लागणार, याबाबत मतदारांमध्ये तसेच राजकीय पक्षांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबईच्या सत्तेची चावी अखेर कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होण्यासाठी यंदा संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.






