मुंबई – राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी याबाबतची अधिकृत माहिती दिली. मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यामुळे राज्यातील १२ जिल्ह्यांत निवडणूक धुरळा उडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, अशा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.
निवडणूक वेळापत्रक
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे: १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६
नामनिर्देशन छाननी: २२ जानेवारी २०२६
उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत: २७ जानेवारी २०२६
अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटप: २७ जानेवारी २०२६, दुपारी ३.३० नंतर
मतदान: ५ फेब्रुवारी २०२६
मतमोजणी: ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी १० वाजल्यापासून
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर येथे जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत.
मतदाराला दोन मते देण्याचा अधिकार
प्रत्येक मतदाराला दोन मते देता येणार असून, एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि एक मत पंचायत समितीसाठी असेल. नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून, ती महापालिका निवडणुकांप्रमाणेच राहणार आहे.
जातवैधता व प्रमाणपत्र अनिवार्य
राखीव जागांवर उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना जातवैधता पडताळणी आवश्यक असेल. उमेदवारी अर्जासोबत जातप्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जातप्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, जातपडताळणी समितीकडे अर्ज दाखल केल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील. निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल, असेही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या घोषणेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, राज्यातील ग्रामीण राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.





