मालवण | प्रतिनिधी
साहित्यिक वैशाली पंडित यांचे लेखन हे कोणत्याही लेखकाच्या अनुकरणाशिवाय स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रतिभेचे उदाहरण आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी केले.
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे ‘आगीनझाडची पंचविशी’ हा विशेष रौप्य महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मालवणच्या ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित लिखित ‘आगीनझाड’ या कथासंग्रहाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा विशेष ‘रौप्यपर्व पूर्ती सोहळा’ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कथा कशी असावी, कथेचे मर्म काय असते आणि भविष्यातील लेखनाच्या दिशा यावर सखोल भाष्य केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी प्रास्ताविक केले. ॲड. अपर्णा प्रभू परांजपे यांनी ‘आगीनझाड’ कथेचे प्रभावी अभिवाचन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
‘आगीनझाड’ या पुस्तकावर आयोजित विशेष परिसंवादात अनुवादिका वंदना करंबेळकर, ॲड. अपर्णा प्रभू परांजपे, अभिनेता अभय खडपकर, कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर आणि बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर सहभागी झाले होते. परिसंवादात कथासंग्रहातील आशय, सामाजिक संदर्भ आणि भाषिक शैलीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी लेखिका वैशाली पंडित यांचा नमिता कीर व किशोर शिरोडकर यांच्या हस्ते विशेष मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच साने गुरुजी वाचन मंदिराच्या कार्याध्यक्ष डॉ. ज्योती (बुवा) तोरसकर यांनी लेखिका वैशाली पंडित यांची रसाळ मुलाखत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गौरी गणपत्ये यांनी मानले. साहित्यप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत हा रौप्य महोत्सव सोहळा संस्मरणीय ठरला.






