कल्याण (पूर्व) | प्रतिनिधी
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज कल्याण पूर्व येथे #शिवसेना विजय निर्धार सभा मोठ्या उत्साहात आणि कल्याणकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात पार पडली. यावेळी विरोधकांना चारी मुंड्या चित करून महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
या सभेत कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांनी कोळी समाज बांधवांसह आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. याबद्दल एकनाथ शिंदे यांनी समाजबांधवांचे आभार मानले.
शिवसेना ही केलेल्या कामांच्या बळावर निवडणुकीला सामोरी जाणारी पक्षसंस्था असल्याचे सांगत एकनाथ शिंदे म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचे ६० हून अधिक नगराध्यक्ष निवडून आले असून राज्यभरात मतदारांनी शिवसेनेला भरभरून पाठिंबा दिला आहे. ह्याच बळावर आता महानगरपालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार असून, यावेळीही जनतेने असाच कौल द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
काही लोक स्वार्थासाठी एकत्र आले असून, आता त्यांना मराठी माणूस आठवू लागला आहे, अशी टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठी माणूस जेव्हा वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथे नाईलाजाने स्थलांतरित झाला तेव्हा कुणालाही त्याची आठवण आली नाही. मात्र क्लस्टर आणि पुनर्विकासाच्या माध्यमातून मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लाडक्या बहिणींनी कायम महायुतीला भक्कम साथ दिली असल्याचे सांगत, महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणाऱ्या योजना कधीही बंद होऊ दिल्या जाणार नाहीत, उलट त्यांना लखपती कसे बनवता येईल यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी दिला. लेक लाडकी लखपती योजना, महिलांसाठी उच्च शिक्षण मोफत योजना, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत अशा अनेक योजनांचा महिलांना मोठा लाभ होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कल्याण पूर्वेत आता पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने, विरोधकांना पाणी पाजण्यासाठी सज्ज रहा, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी शहरातील विकासकामांचा आढावा देताना त्यांनी बेतुरकर पाड्यात क्लस्टर बांधणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कल्याण पूर्व–पश्चिम जोडणारा उड्डाणपूल, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, नेवाळी ते चक्की नाका १०० कोटींचा रस्ता, खानदेश भवन आणि मराठा भवन यांसारख्या विकासकामांचा उल्लेख केला.
कल्याणचा सर्वांगीण विकास साधला असून, हा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
याप्रसंगी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राजेश कदम, रवी पाटील, अरविंद मोरे, विधानसभा प्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक नीलेश शिंदे, शिवसेनेचे संभाव्य उमेदवार, पदाधिकारी, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.






