डोंबिवली | प्रतिनिधी
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज डोंबिवली येथे #शिवसेना विजय निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा महानगरपालिकेवर फडकवण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना १९८३ साली झाली असून, गेल्या जवळपास ४० वर्षांपासून या महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. ही गौरवशाली परंपरा भविष्यातही अबाधित ठेवण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेची वैचारिक युती असून, ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कल्याण–डोंबिवलीकरांनी आजवर महायुतीला भक्कम पाठिंबा दिला असून, येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात महायुतीलाच प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
गेल्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात कल्याण–डोंबिवली शहरात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्याचे नमूद करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, डोंबिवलीतील संत सावळाराम क्रीडा संकुल, सुतिका गृहाच्या जागेवर उभारण्यात येणारे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल, शहरातील सर्वत्र काँक्रीटचे रस्ते, समाज मंदिरे, कल्याण–शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण, कल्याण रिंग रोड, मेट्रो-१२, शिळफाटा येथील सहापदरी उड्डाणपूल, पलावा उड्डाणपूल, पत्री पूल व लोकग्राम पूल यांसारखी अनेक विकासकामे पूर्ण झाली असून अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
या विकासाचा वेग आगामी काळातही कायम ठेवून शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर महायुतीला पुन्हा संधी देणे आवश्यक आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. मेळाव्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.





