मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा आढावा
लोकहितांच्या योजनांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिकाधिक सुलभ आणि सहज सुविधा उपलब्ध होतील यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्येक विभागामध्ये वापर करण्यात यावा. महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचा विस्तार करतांना त्यामध्ये आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमांतर्गत विविध विभागांमधील प्रलंबित कामांचा आढाव्यानुसार दिनांक १६ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या धोरणात्मक बाबींमध्ये ८८३ मुद्द्यांपैकी ८०७ मुद्द्यांवरील कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून ९१ टक्के पूर्णत्वाचे प्रमाण साध्य झाले आहे. १ मे २०२५ रोजी हे प्रमाण ७८ टक्के होते, त्यामुळे अल्प कालावधीत लक्षणीय प्रगती झाल्याचे स्पष्ट होते.
बैठकीत पेन्शन सुधारणा, निती आयोगाकडून एपीआय प्राप्ती, तृतीयपंथी व्यक्तींसाठी बीजभांडवल, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि निवारा गृहांची स्थापना इत्यादीबाबत योजना तयार करणे, सुधारित विद्यार्थी हरीत सेना योजनेअंतर्गत “चला जाऊया वनाला” उपक्रम राबविणे, वाघ/बिबट गावात येताच नागरिकांना धोक्याची सूचना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारीत ड्रोन व आभासी भिंत यंत्रणा उभारणे, पाच हजार गिरणी कामगारांच्या घरांचे डिपीआर मंजूर करणे, विविध कार्पोरेशन आणि त्यांच्या उपकंपन्यांसाठी एक युनिर्व्हसल पोर्टल तयार करणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नाशिक- मुंबई राष्ट्रीय महामार्ग (भाग – ठाणे ते वडपे) सुधारणा करण्याचे कामामधील पूल व भूयारी मार्ग पूर्ण करणे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 13.30 कि.मी. मिसिंग लिंकचे काम पूर्ण करणे, पवनार ते पत्रा देवी (नागपूर-गोवा) शक्ती पीठ द्रुतगती महामार्ग भुसंपादन प्रक्रियेअंतर्गत संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण करणे, आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता खेळाडूंसोबत कोच व फिजिओथेरपिस्ट घेऊन जाण्यासाठी आर्थिक सहाय्य करणेबाबत शासन निधी किंवा सीएसआर मधून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी धोरण ठरविणे, नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरीत करणे, ड्रोन धोरण निश्चित करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण निश्चित करणे, प्रायोगिक तत्वावर दहा ठिकाणी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची सतत तपासणी (Real Time Monitoring) करण्याकरिता अत्याधुनिक यंत्रणा उभारणे, प्रस्तावित शिवसृष्टी थीम पार्क उच्चस्तरीय समिती व शिखर समितीची मान्यता या महत्वाच्या विषयांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.





