रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या आणि कोकणातील लोकसंस्कृती व परंपरेचे जतन करणाऱ्या कुणबी महोत्सवाच्या निमित्ताने, कोकणातील ग्रामीण भागातील प्रश्न सातत्याने आणि परखडपणे मांडणारे धडाडीचे व निःपक्षपाती पत्रकार म्हणून ओळखले जाणारे कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांना ‘रत्नागिरी भूषण पुरस्कार 2025’ प्रदान करून गौरविण्यात आले.
कोकणात प्रथमच गोताडवाडी येथे आयोजित भव्य कुणबी महोत्सवात हा सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सुहास खंडागळे आणि उदय गोताड यांच्या आयोजनाखाली झालेल्या या सांस्कृतिक उत्सवात रविवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कला, क्रीडा, पत्रकारिता, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत तेजस बोरघरे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
कोकणाच्या मातीशी नाळ जुळवून तळागाळातील जनतेचे प्रश्न, वेदना, संघर्ष आणि विकासाच्या गरजा निर्भीडपणे समाजासमोर मांडण्याचे काम तेजस बोरघरे यांनी केले आहे. त्यांच्या कार्यातील व्यापकता, धडाडीची मांडणी आणि निःपक्षपाती भूमिका लक्षात घेऊन त्यांची ‘रत्नागिरी भूषण पुरस्कार 2025’ साठी निवड करण्यात आली.
गेल्या आठ वर्षांत तेजस बोरघरे यांनी महाराष्ट्रातील विविध प्रमुख माध्यमसंस्थांमध्ये कार्य करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकसत्ता, मॅक्स महाराष्ट्र, लोकशाही, जय महाराष्ट्र या प्रतिष्ठित न्यूज नेटवर्कमध्ये काम केल्यानंतर ते सध्या पुढारी न्यूजमध्येही कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते कोकण कट्टा न्यूजचे संपादक म्हणून काम पाहत असून या माध्यमातून कोकणातील तळागाळातील प्रश्न प्रभावीपणे मांडत आहेत.
या कार्यक्रमाला कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युट्यूबर तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोकणातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध उपक्रमही राबविण्यात आले.
या प्रसंगी रील्स्टार संदीप पावसकर, चला हवा येऊ द्या फेम अभिनेते सचिन काळे, सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर, प्रा. डॉ. आनंद आंबेकर, राजेश गोताड, माजी पोलिस पाटील रामचंद्र धावडे, कृषितज्ज्ञ राहुल यादव, बुधाजी खंडागळे, तसेच आयोजक सुहास खंडागळे, उदय गोताड यांच्यासह मंगेश धावडे, श्यामकर्ण भोपळकर, सुरेंद्र काब्दुले, डॉ. मंगेश कांगणे, अमित गमरे, नितीन गोताड, सतेज जाधव, अनघा कांगणे, ईश्वरी यादव, स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



