मुंबई | प्रतिनिधी
स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशपातळीवरील “बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धे”मध्ये पुण्याच्या निधी घारे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर सार्थक बावीकर याने द्वितीय क्रमांक मिळविला. बदलापूरच्या सोजी मॅथ्यू हिने तृतीय पारितोषिकावर नाव कोरले.
नटसम्राट बालगंधर्व यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध शहरांतील तब्बल ९७ स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यापैकी २७ स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड करण्यात आली. मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे २६ जून रोजी उपांत्य आणि अंतिम फेरी पार पडली. अंतिम फेरीसाठी नऊ स्पर्धकांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
अंतिम फेरीचे परीक्षण संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ गायक-अभिनेता मुकुंद मराठे, ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री बकुळ पंडित आणि ज्येष्ठ गायक-अभिनेता ज्ञानेश पेंढारकर यांनी केले.
स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव पद्मश्री पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे आणि आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्पर्धेच्या संयोजिका तपस्या नेवे, अमेय रानडे, तसेच आयोजक रजनीश राणे, भाऊ कोरगावकर, शलाका कोरगावकर, विवेक माणगावकर, दिनेश पिळगावकर आणि प्रदीप चित्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल :
- अरविंद पिळगावकर स्मृती प्रथम पुरस्कार (रु. २५,००० व सन्मानचिन्ह) – निधी घारे (पुणे)
- सीताराम गणपती मणेरकर स्मृती द्वितीय पुरस्कार (रु. १५,००० व सन्मानचिन्ह) – सार्थक बावीकर (पुणे)
- सुनीता प्रदीप चित्रे स्मृती तृतीय पुरस्कार (रु. १०,००० व सन्मानचिन्ह) – सोजी मॅथ्यू (बदलापूर)
शरद आचार्य स्मृती उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु. ३,००० व सन्मानचिन्ह) :
चैतन्य फाटक (डोंबिवली), तन्वी गोरे (डोंबिवली), शिवम रायकर (फोंडा, गोवा) आणि सार्था गवाणकर (रत्नागिरी).







