दापोली : तालुक्यातील पत्रकारितेच्या माध्यमातून समाज, विकास आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन २०२६ च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी पुरस्कार कोकण कट्टा न्यूज चॅनलचे पत्रकार सलीम रखांगे यांना जाहीर करण्यात आला आहे. दापोलीतील विविध प्रश्न, सामान्य नागरिकांच्या समस्या सातत्याने मांडून न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या पत्रकारितेची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
तसेच विकासात्मक पत्रकारिता पुरस्कार दैनिक सागर माटवणचे प्रतिनिधी राधेश लिंगायत यांना जाहीर झाला असून त्यांनी पर्यटन, मत्स्य व्यवसाय आणि स्थानिक विकासाशी संबंधित विषयांवर सातत्याने केलेल्या लेखनाचे कौतुक करण्यात आले आहे.
विशेष पुरस्कार दैनिक सागर माटवणचे वार्ताहर अजित मोरे यांना जाहीर करण्यात आला आहे.
याशिवाय, पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेले सिद्धेश शिगवण यांना युवा पत्रकार पुरस्कार, तर याशिवाय, कोकण कट्टा न्यूज चॅनलच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेले आहे.तेजस बोरघरे यांना विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी अजित सुर्वे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हे पुरस्कार रामराजे महाविद्यालयात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.




